जळगाव मिरर | ८ डिसेंबर २०२५
बकऱ्या चारण्यासाठी जात असलेल्या तरुणीला मदतीच्या बहाण्याने शेतात बोलावून तिचा विनयभंग केल्याची गंभीर घटना तालुक्यातील एका गावाजवळ ५ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी आरोपी हरि बारी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंग तसेच अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, संबंधित तरुणी बकऱ्या चारण्यासाठी जात असताना आरोपी हरि बारी याने तिला शेतात फवारणी पंप उचलण्यास मदत मागितली. तरुणी मदतीसाठी पुढे गेल्यानंतर आरोपीने तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. तसेच तिच्याकडून शारीरिक संबंधांची मागणी केली. अचानक घडलेल्या प्रसंगामुळे तरुणी प्रचंड घाबरली. या विषयी कोणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही आरोपीने दिली. अखेर धैर्य एकवटून तरुणीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानुसार आरोपी हरि बारीविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे करीत आहेत.




















