जळगाव मिरर | ३० जुलै २०२५
कोकणातील चिपळूण शहरात वाशिष्ठी नदीत उडी घेऊन धुळे जिल्ह्यातील एका तरुण आणि तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. चिपळूण येथील गांधेश्वर मंदिर परिसरात ही घटना घडली असून, तरुणी पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.
सध्या कोकणात पावसाळी पर्यटनाला भरपूर वाव मिळत असून, निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी देशभरातून पर्यटक येथे दाखल होत आहेत. मात्र, अशा आनंदाच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही दुर्दैवी घटना अनेकांना सुन्न करणारी ठरली आहे.
हादरवून टाकणाऱ्या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. एनडीआरएफचे जवान मृतदेह शोधण्याचे आणि बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून, मृत युवक-युवती धुळे जिल्ह्यातील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे निसर्गरम्य कोकणात आलेल्या इतर पर्यटकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, अशा ठिकाणी सुरक्षिततेसाठी अधिक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
