जळगाव मिरर | ८ नोव्हेबर २०२४
पारोळा तालुक्यातील आंबापिंप्री शिवारातील शेतात स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांनी छापा टाकून सुमारे १२ लाख रुपयांची गांजाची झाडे जप्त केली आहेत. गत १५ दिवसात पोलिसांनी केलेल्या या दुसऱ्या कारवाईनंतर अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारावर ६ रोजी पारोळा येथील पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस गणेश वाघमारे, राहुल कोळी, दत्ता पाटील, प्रवीण मांडोळे, भगवान पाटील, प्रवीण पारधी, संदीप सातपुते, सुनील हटकर यांनी आंबापिंप्री शिवार गाठले. या वेळी आंबापिंप्री शिवारातील अरुण दोधू कोळी यांच्या शेतात स्थानिक गुन्हे शाखा व पारोळा पोलिसांनी जाऊन चौकशी केली असता या शेतामध्ये ३० ते ३५ हिरवीगार गांजाची झाडे आढळून आली. या झाडांचे ११९ किलो वजन असून या गाजांच्या झाडांची किंमत जवळपास १२ लाख रुपये आहे.
ही सर्व झाडे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. दरम्यान, ज्यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली, त्यावेळी संबंधित शेतकरी तेथे हजर नव्हता. तर या घटनेची माहिती कळताच हा शेतकरी पसार झाला आहे. याबाबत संशयित शेतकऱ्याविरुद्ध पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून दरम्यान पारोळा तालुक्यात गेल्या १५ दिवसात पोलिसांकडून ही दुसरी कारवाई करण्यात आली आहे.