जळगाव मीरर | ३१ ऑक्टोबर २०२४
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त विद्यमाने जयश्रीताई सुनील महाजन यांनी जळगाव शहरात महिला उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. काल दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी जयश्रीताईंनी सदाशिव नगर, यमुना नगर, चौधरी वाडा, कोल्हे वाडा आणि अयोध्या नगर या भागांमध्ये भेट देऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या आजवरच्या कार्याचा आढावा सांगतांनाच परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी अनेक मतदारांनी शहरातील निकृष्ट रस्त्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. जयश्रीताईंनी रस्त्यांच्या कामांसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. महापौर म्हणून काम करताना नगरसेवकाच्या पक्षपातीपणापेक्षा शहराच्या विकासाला प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले. याच कार्याच्या बळावर त्यांनी मतदारांना विश्वासाने मतदान करण्याचे आवाहन केले.
जयश्रीताईंनी महिलांना विशेष आवाहन करतांना म्हटले, की “महिलांना नेतृत्वात आणण्याच्या दिशेने या निवडणूकीत महिलांची मोठी जबाबदारी आहे. महिलांनी एकत्र येऊन मला निवडून द्यावे, ही माझी अपेक्षा आहे.” शिक्षिका असल्यामुळे शिस्तबद्ध व कुशल कार्य करण्याची सवय असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आणि जळगावला अग्रस्थानी नेण्यासाठी संधी मिळावी, अशी आशा व्यक्त केली.
शहरातील विविध मुद्द्यांवर बोलताना स्वामी समर्थ मठाच्या समस्येवर त्यांनी सक्रियतेने आंदोलन केल्याचा दाखला दिला. जळगाव ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी असून, येथे कोणत्याही प्रकारच्या समस्यांसाठी मी नेहमीच सज्ज आहे, असे ठामपणे त्यांनी नमूद केले.
जयश्रीताईंनी तरुणांना आश्वासन देत म्हटले की, गावातील तरुणांना नोकरीसाठी बाहेरगावी जावे लागू नये म्हणून प्रयत्न करणार आहे. मला संधी द्या, मी माझे शब्द नक्कीच पाळेल. या निवडणुकीने शहरात परिवर्तनासाठी महिलांचे नेतृत्व आणि तरुणांसाठी संधीचा नवा अध्याय खुला होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जयश्रीताईंसारखा आश्वासक महिला उमेदवार असल्याने जळगावातील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.