जळगाव मिरर | ७ जुलै २०२५
मला न्यायालयाच्या तारखेवर हजर करा, असे म्हणत हर्षद रब्बी पटेल (वय २१, रा. सुप्रिम कॉलनी) याने जिल्हा कारागृहात गोंधळ घातला. तसेच बॅरेकमध्ये जाण्यास नकार देत कर्तव्यावर हजर असलेल्या अंबादास जुलाल देवरे (वय ४०, रा. कारागृह वसाहत) या कर्मचाऱ्यास मारहाण केली. ही घटना ५ जुलै रोजी जिल्हा कारागृहात घडली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील हर्षद पटेल हा कारागृहात बंदीवान म्हणून आहे. दि. ५ जुलै रोजी पटेल याच्यासह अन्य बंद्यांना बॅरेकच्या बाहेर काढलेले होते. बॅरेकमध्ये परत जाण्याची वेळ झाल्याने कर्मचारी अंबादास देवरे यांनी त्यास बॅरेकमध्ये जाण्यास सांगितले. मात्र त्या बंदीवानाने बॅरेकमध्ये जाण्यास नकार देत माझी न्यायालयाची तारीख आहे, मला तारखेवर पाठवा असे सांगितले. त्या वेळी सुभेदार सुभाष खांडरे यांनी पोलिस पथक उपलब्ध नसल्याने तारखेवर नेता येणार नसल्याचे त्याला सांगितले. मात्र तरी देखील तो ऐकायला तयार नव्हता.
कारागृहातील पोलिसांकडून बंदीवानाला पुन्हा समजवून सांगत होते. मात्र तो बेभान होऊन शिवीगाळ करीत देवरे यांच्या अंगावर धावून आला. तसेच धक्काबुक्की करीत त्यांना मारहाण देखील केली. अन्य कर्मचाऱ्यांनी देवरे यांना त्याच्या तावडीतून सोडविले. या प्रकरणी अंबादास देवरे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून हर्षद पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि उल्हास चहाटे करीत आहेत.
