जळगाव मिरर | २० नोव्हेंबर २०२५
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अमानवी अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरले असून, या प्रकरणी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर छावा मराठा युवा महासंघ उत्तर महाराष्ट्र विभागातर्फे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जळगाव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्यानुसार, ग्रामिण भागातील बालसुरक्षेचा गंभीर प्रश्न या घटनेमुळे समोर आला असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. समाजातील महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेला अविश्वास दूर करण्यासाठी तातडीने कडक पावले उचलावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे –
• सदर प्रकरणा फास्ट-ट्रॅक कोर्टाद्वारे प्राधान्याने चालवून न्यायालयीन प्रक्रियेला गती द्यावी व आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी.
• डोंगराळे गावात बालसुरक्षा, महिला सुरक्षा आणि जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी.
• ग्रामीण भागात सीसीटीव्ही, बीट-पोलिस गस्त आणि रात्री गस्त पथकांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक यंत्रणा द्यावी.
• महिलांमध्ये व मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, तसेच समाजात कायद्याविषयीचा विश्वास दृढ व्हावा करण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणी काटेकोर दखल घेऊन कडक उपाययोजना कराव्यात.
• पीडित परिवाराला तातडीने सर्वतोपरी शासकीय मदत, मनोसामाजिक समुपदेशन आणि सुरक्षा पुरवावी.
या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण यांना देण्यात आले. निवेदन देतांना छावा मराठा युवा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अमोल कोल्हे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण ठाकूर, आघाडीच्या महानगर उपाध्यक्ष विद्या झनके, योगिता वाघ, उज्ज्वला सपकाळे, शारदा तायडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य सागर साळुंखे, आनंद महिरे, भीमराव सोनवणे, कैलास पवार, सुधाकर पाटिल यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पीडितेला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी संघटनेने प्रशासनाकडे केली आहे




















