जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२५
महायुती व महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, काही लोकं हे केवळ मराठी माणसाबद्दल बोलत राहिले पण त्यांनी काहीच केलं नाही. आज मला या गोष्टीचा समाधान आहे की आम्ही त्या मराठी माणसाला त्याचं हक्काचं घर हे या ठिकाणी देऊ शकलो आहे. आम्ही तुम्हाला हक्काचे छप्पर देतोय, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. भविष्यातील हा माझा संकल्प आहे की जोपर्यंत स्वयं-पुनर्विकास ऑटो पायलट मोडवर जात नाही, तोपर्यंत जेवढे बदल करावे लागतील तेवढे बदल करण्याची माझी तयारी आहे. त्या संदर्भात सगळ्या बाजूला आपण करूया आणि स्वाभिमानानं स्वयंपूर्ण विकासातून या ठिकाणी आत्मनिर्भर अशा प्रकारचा आमचा मुंबईकर हा उभा करण्याचा संकल्प आज मी घेतो”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तर मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, तोडणार म्हणून फक्त निवडणुकीपुरती मराठी माणसाची आठवण येते. निवडणूक आली की मुंबईकर आणि मराठी माणूस आठवतो, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
