जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२५
राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये यंदा अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद न दिल्याने नाराज होते आज माजी मंत्री भुजबळ व मुख्यमंत्री फडणवीस एकाच व्यासपीठावर आले होते. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. इतकेच नाही तर या कार्यक्रमात झालेल्या भाषणात छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे तर फडणवीस यांनी छगन भुजबळ यांचे कौतुक केले.
मंत्रिमंडळ स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी फडणवीस आपल्याशी नंतर चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. त्या भेटीनंतर आज पुन्हा या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. मात्र या भेटीत दोघांमध्ये काय चर्चा झाली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत या कार्यक्रमात भुजबळ तसेच मंत्रिमंडळातील सदस्य पंकजा मुंडे , शंभूराज देसाई , शिवेंद्रसिंहराजे भोसले , जयकुमार गोरे , मकरंद पाटील , आदिती तटकरे आणि काही आमदार उपस्थित होते.
छगन भुजबळ यांच्याशी आपली चर्चा झाली त्यानुसार काय नेमकी चर्चा झाली असे विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे कार्य पुढे नेण्याची व समता युक्त समाज तसेच संविधान प्रेमी समाज कसा निर्माण करता येईल यासाठी काय करावे लागेल याविषयी छगन भुजबळ यांच्याशी चर्चा झाल्याचे आणि दुसरी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारका अभिवादन केल्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या मुळ घरी उभारलेल्या चित्र प्रदर्शनाची व घरातील वस्तूंची पाहणी केली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मूळ गावी खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे महाराष्ट्र शासन एक चांगला प्रकल्प उभा करत आहे. हे स्मारक चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे प्रेझेंटेशन मला दाखवले असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 वा जयंती उत्सव व भारतीय स्त्री मुक्ती दिन या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आले असताना ते अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
