जळगाव मिरर | ३१ ऑक्टोबर २०२३
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी मराठा आरक्षणासाठी बैठकीचे नियोजन केले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा देखील केली त्यानंतर मनोज पाटील एक पत्रकार परिषद घेतली.
आपण आपले आंदोलन थांबवणार नाही, मराठा समाजाला अर्धवट आरक्षण दिले जात असून आम्ही ते स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. आपण पाणी प्यायला सुरुवात केल्यापासून राज्यभरात सुरू असलेले जाळपोळीचे प्रकार थांबले असल्याचे ते म्हणाले.
लोकप्रतिनिधींकडे होत असलेली राजीनाम्याची मागणी, जमावाने लोकप्रतिनिधींच्या मालमत्तेची केलेली नासधूस याबद्दल प्रश्न विचारला असता जरांगे पाटील यांनी म्हटले की, लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिल्याने काय फायदा-नुकसान होणार आहे हे मला माहिती नाही, मात्र लोकप्रतिनिधी, मंत्र्यांनी दबावगट तयार करून आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सगळ्यांनीच राजीनामे दिले तर सभागृहात आवाज कोण उठवणार? म्हणून आमदार खासदारांनी मुंबई गाठावी आणि तिथेच थांबून आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावे असे ते म्हणाले.