जळगाव मिरर | २३ सप्टेंबर २०२५
राज्यातील अनेक जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अतिवृष्टीने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जात होती. याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी 2 हजार 215 कोटींची मदत जाहीर केली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने ही मोठी घोषणा केली आहे. 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे. जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली, त्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अद्याप पंचनाम्याचे काम थांबवलेले नाही. नवनव्या ठिकाणी पाऊस पडत आहे. तिथे पंचनामे करून मदत केली जाईल. एखाद्या जिल्ह्यात आता कमी मदत दिसत असेल तरी उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळेल. शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी हा उद्देश आहे.”
“घर, जमीन याबाबत नुकसानीची भरपाई देण्याचे अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहेत. पैशांची कुठली कमतरता पडणार नाही याची काळजी घेत आहोत. कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती आहे याचा आढावा आम्ही घेतला आहे. पालकमंत्र्यांसह मंत्र्यांना पूरग्रस्त भागात भेटी देण्याच्या सूचना दिल्या आहेत,” असेही फडणवीस म्हणाले.




















