जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२४
सोमवारी शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरल्यानंतर मंगळवारी सुवर्ण बाजारातही पडझड झाली. चांदीच्या भावात एकाच दिवसात दोन हजार ५०० रुपयांनी घसरण होऊन ती ८० हजार ८०० रुपये प्रति किलोवर आली. सोने भावातही ७०० रुपयांची घसरण होऊन ते ७० हजार रुपये प्रति तोळ्यावर आले. अमेरिकेतील राजकीय घडामोडी, त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल व डॉलरचे घसरत जाणारे दर यामुळे जगभरात चिंता वाढत आहे.
सोमवारी (५ ऑगस्ट) जागतिक पातळीवर शेअर बाजारात घसरण झाल्यानंतर एमसीएक्सवर सोने-चांदीचे भाव गडगडले होते. मात्र, प्रत्यक्ष सुवर्ण बाजारामध्ये सोने भाव केवळ १०० रुपयांनी, तर चांदीचे भाव २०० रुपयांनी कमी झाले होते. त्यामुळे सोने ७० हजार ७००, तर चांदी ८३ हजार ३०० रुपयांवर आली होती. त्यानंतर मात्र मंगळवारी (६ ऑगस्ट) सोन्याचे भाव ७०० रुपयांनी घसरून ७० हजार रुपये प्रति तोळ्यावर आले, तर चांदीमध्ये थेट दोन हजार ५०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचे भाव ८० हजार ८०० रुपये प्रति किलोवर आले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सोने-चांदीवरील सीमा शुल्क कमी करण्याची घोषणा झाल्यानंतर सोने-चांदीचे भाव घसरत गेले. त्यानंतर ते काहीसे वाढत असताना पुन्हा आता मोठी घसरण झाली आहे. एकाच दिवसात चांदीमध्ये झालेली दोन हजार ५०० रुपयांची घसरण चांदीला तीन महिन्यांच्या नीचांकावर घेऊन आली आहे. यापूर्वी ४ मे रोजी चांदी ८० हजार ८०० रुपये प्रति किलोवर होती. त्यानंतर तिचे भाव वाढत गेले व चांदीने नवनवीन उच्चांक गाठले होते. मात्र, आता पुन्हा एकदा चांदीचे भाव ८० हजार ८०० रुपयांवर आले आहेत.