पुणे : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या हिंदीच्या मुद्यावर सरकारने निर्णय घेतल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याला वाजत – गाजत येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे हे दोन्ही भाऊ या मेळाव्याच्या निमित्ताने एका व्यासपीठावर येणार हे स्पष्ट झाले आहे. विशेषतः ठाकरे बंधू केव्हा एकत्र येणार? हा अवघ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्नही या निमित्ताने निकाली निघाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने हिंदीची सक्ती करणारा जीआर मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर स्फुरण चढलेल्या मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 5 जुलै रोजी विजयी मेळावा बोलावण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, त्यांचा संयुक्त मेळावा 5 जुलै रोजी सकाळी 10 वा. वरळी डोम येथे होणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव व राज ठाकरे बऱ्याच वर्षांनंतर एका व्यासपीठावर येणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी मंगळवारी एका संयुक्त निवेदनाद्वारे मराठी जनतेला या मेळाव्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळत येण्याचे आवाहन केले आहे.
काय म्हटले आहे राज व उद्धव ठाकरेंनी?
राज व उद्धव ठाकरे यांनी आपल्या संयुक्त पत्रकात म्हटले आहे की, आवाज मराठीचा! मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं. कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं. आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे.
वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या. आम्ही वाट बघतोय, असे राज व उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे मनसेच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आलेल्या या पत्रकात राज ठाकरे यांचे नाव उद्धव ठाकरे यांच्या अगोदर लिहिण्यात आले आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मराठी जनतेला 5 तारखेच्या विजयी मेळाव्याला येण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्राच्या शत्रूंना आणि मराठीच्या मारेकऱ्यांना आव्हान आणि आवाज देणारी घडामोड! यावे… जागराला यावे, असे त्यांनी राज व उद्धव ठाकरे यांचे संयुक्त पत्रक प्रसिद्ध करताना म्हटले आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी आपले हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टॅग केले आहे. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे या चारही नेत्यांना या मेळाव्याचे निमंत्रणच दिले आहे.
