जळगाव : प्रतिनिधी
देशात रामराज्य आणि शिवशाही आणणे हेच आमचे ध्येय आहे. आम्ही संविधान बदलणार असा आरोप होतोय, पण संविधान, घटना ८० वेळा तोडण्याचं पाप काँग्रेसने केलं. पार्ट बी मध्ये काही बदल होऊ शकतात. पण संविधान बदलविण्याचा अधिकार पंतप्रधान, राष्ट्रपतींना देखील नाही. त्यामुळे काँग्रेस अपप्रचार करीत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथील सभेत केला.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ शिवतीर्थ मैदानावर ही सभा होती. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, आमदार किशोर पाटील, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील उपस्थित होते. आज जातीयवादाचं राजकारण सुरू आहे, ज्यांना कार्य आणि कर्तृत्वावर निवडून येता येत नाही ते जातीची ढाल पुढे करतात असा आरोप त्यांनी केला.