
जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२५
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते महायुतीवर सडेतोड टीका करीत असतांना आता मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अतिरेक्यांकडे लोकांचा धर्म विचारायला वेळ असतो का?’ असा सवाल करणाऱ्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. अशा प्रकारची विधाने करून पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. अशा विधानांना मूर्खपणा म्हणावे की काय? हे समजत नाही, असे ते म्हणाले.
विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी पहलगाम हल्ल्याविषयी वादग्रस्त विधान केले. अतिरेक्यांकडे लोकांचा धर्म विचारून गोळीबार करण्याएवढा वेळ कुठे असतो? असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांच्या या विधानाचा तिखट समाचार घेतला. अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊन जे लोक मृत्युमुखी पडलेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. आत्ता नातेवाईकांच्या म्हणणे माध्यमांनी जाहीरपणे सांगितले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अतिरेक्यांनी धर्म विचारून मारले. त्यामुळे वडेट्टीवारांनी असे विधान करू नये. ते तिथे घटनास्थळी होते का? इथे बसून अशी विधान करणे हे अतिशय वाईट आहे. याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावे? हे मला समजत नाही. माझ्याकडे यासाठी शब्द नाहीत, असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्यातील सर्वच पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्यात यश आल्याचेही सांगितले. ते म्हणाले, या प्रकरणी अद्याप आकडा स्पष्ट झाला नाही. पण पोलिस विभाग लवकरच हा आकडा जाहीर करेल. पण मी स्पष्ट करतो की, जे पाकिस्तानी नागरिक भारतातून बाहेर गेले पाहिजेत, अशा सर्व नागरिकांची ओळख पटवण्यात आली, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांना बाहेर जाण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांचे ट्रॅकिंगही सुरू आहे. त्यांची आकडेवारी लवकर सांगितली जाईल. पण केंद्र सरकारने सांगितलेल्या कॅटेगरीतील कोणताही नागरिक आम्हाला सापडला नाही असे नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील काही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे विधान केले होते. पत्रकारांनी यावेळी फडणवीसांना छेडले असता त्यांनी अशी कोणतीही बाब नसल्याचे स्पष्ट केले. अनेकदा मंत्री त्यांना झालेल्या ब्रिफिंगच्या आधारावर बोलत असतात. म्हणूनच मी काल गृहमंत्री म्हणून यासंबंधीची ऑथेंटिक माहिती दिली. मी पुन्हा एकदा सांगतो. जे पाकिस्तानी नागरिक बाहेर जायला पाहिजे, अशा सर्वच नागरिकांची ओळख पटली आहे, असे ते म्हणाले.