
जळगाव मिरर | १० एप्रिल २०२६
समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात भव्य ‘संविधान जागर यात्रा’ काढण्यात येणार असून, या माध्यमातून सामाजिक समता आणि संविधानिक मूल्यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
भारतीय जनता पार्टी जळगाव महानगरच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात भाजपा कार्यालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून होणार असून, त्यानंतर शहरातून संविधान जागर यात्रेला प्रारंभ केला जाणार आहे.
या यात्रेचा उद्देश महात्मा फुले यांनी दिलेल्या सामाजिक समता, स्त्री शिक्षण, शेतकरी व वंचित घटकांच्या उन्नतीच्या विचारांचा प्रसार करणे हा आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक मूल्यांचा जागर जनतेमध्ये करण्यावर भर दिला जाणार आहे.
या कार्यक्रमाला जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा), भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, महापौर दिपमाला काळे तसेच स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यात्रेचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (जी.एस. ग्राउंड) येथून होणार असून, रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे माल्यार्पण करण्यात येईल. त्यानंतर गोलाणी मार्केट येथील महात्मा फुले स्मारक येथे यात्रेची सांगता होणार आहे.
शनिवार, ११ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता या यात्रेला सुरुवात होणार असून, जळगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या उपक्रमातून समाजात समता, बंधुता आणि संविधानिक जाणीव दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याने, या यात्रेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





















