जळगाव मिरर | १९ जून २०२४
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अजित पवारांनी बाहेर निघत भाजप सोबत गेल्यावर देखील लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाला नाही. त्यामुळे महायुतीत खटके उडत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या एका बैठकीत अजित पवार यांच्यामुळे आपला पराभव झाला अशा पद्धतीची भावना काही आमदारांनी व्यक्त केली. त्यावर आता अजित पवारांच्या आमदारांनी प्रतिक्रिया देत भाजपला थेट इशाराच दिला आहे. जर भाजपच्या ज्या कोणी आमदारांकडून जाणीवपूर्वक अजित पवारांना टार्गेट केलं जात असेल तर माझं त्यांना सांगणं आहे की, तर आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल, अशा शब्दात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी इशारा दिला आहे.
राज्यातील महायुतीत सद्या आलबेलं नसल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुतीच्या पराभवास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जबाबदार धरलं जात आहे. भाजप नेत्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवारांमुळे आमची मतं वाढल्याचं म्हटलं. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मासिकातून थेट अजित पवारांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच काही नेतेही खासगीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोष देत आहेत. त्यावर, आता पहिल्यांदाच अजित पवारांच्या नेत्याने थेट इशारा दिला आहे.
मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे यांनीही अजित पवारांच्या पक्षाने आपणास मदत न केल्याचं जाहीरपणे बोलून दाखवलं होतं. त्यामुळे, महायुतीत एकसुत्रता आणि एकोपा नसल्याचे समोर आले. त्यानंतर, निवडणूक निकालात अजित पवारांच्या आमदारांचा म्हणावा तेवढा फायदा भाजपला झाला नाही. याशिवाय अल्पसंख्याक समाजही अजित पवारांसमवेत न राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे, अजित पवार महायुतीच्या पराभवाचे व्हिलन ठरवले जात आहेत. त्यावरुन आता अमोल मिटकरी यांनी थेट इशाराच दिला आहे.