जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२४
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठे यश आले आहे. या महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात माहिती दिली. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच निकषात बदल करण्यात आले नसल्याचे ते म्हणाले.
जुलै महिन्यात लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्त्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्यात आले होते. निवडणुकीनंतर डिसेंबरचे पैसे कधी येणार, असा प्रश्न सर्वांना पडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आज सभागृहात माहिती दिली. तसेच खात्यामध्ये 1500 की 2100 किती पैसे जमा होणार? योजनेचे निकष काय असतील? या सर्व प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तरे दिली.
आम्ही जी आश्वासने दिली आहेत, ती आम्ही पूर्ण करणार आहोत. कुणीही मनात शंका ठेऊ नये. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे फडणवीस म्हणाले. आमची एकही योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाहीत. ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना आपण पैसे देत आहोत, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने एकूण 35 हजार 788.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर केल्या होत्या. त्यात लाडकी बहीण योजनेसाठी 1 हजार 400 कोटी रुपयांच्या तरतुदीचा समावेश आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करून त्यातील महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांच्याकडून केला जात आहे. मात्र, लाडकी बहिण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे आमदार आदिती तटकरे यांनी म्हटले. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांना 2100 रुपयांचा लाभ देण्याचे महायुतीने कबूल केलेले आहे. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याची घोषणा करणार असल्याचे देखील तटकरे यांनी सांगितले आहे. सध्या ज्या महिलांना लाभ मिळत आहे, तो पुढील अर्थसंकल्पापर्यंत तसाच मिळत राहणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले होते.