
जळगाव मिरर | १ एप्रिल २०२५
कर्ज फेडण्यासाठी घेतलेले हातउसनवारीने घेतले पैसे देण्यासाठी तणावात असलेल्या लीलाधर जयराम पाटील (वय ५०, रा. भोकर, ता. जळगाव) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जळगाव तालुक्यातील भोकर येथे सोमवार दि. ३१ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील भोकर गावात लीलाधर पाटील यांच्यावर ४० ते ५० हजार रुपयांचे कर्ज होते. त्यांनी इतरांकडून हातउसनवारीने पैसे घेऊन कर्ज फेडले. मात्र इतरांची रक्कम कशी द्यावी, या चिंतेत ते होते. सोमवार दि. ३१ मार्च रोजी घरातील सर्वजण शेतात गेलेले असताना घरी एकटेच असलेल्या लीलाधर पाटील यांनी गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी असा परिवार आहे.





















