
जळगाव मिरर | ३० मार्च २०२६
जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या पोलीस वसाहतीच्या आवारात सुरक्षा भिंतीलगत कुजलेल्या अवस्थेत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने रविवारी दुपारी खळबळ उडाली. उग्र दुर्गंधीमुळे ही घटना उघडकीस आली असून मृत व्यक्ती भिकारी असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस वसाहती परिसरात सध्या बांधकाम सुरू आहे. शनिवारी या भागात काही नागरिकांना उग्र वास येत होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रविवारी सकाळपासून वास तीव्र झाल्याने समोरच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महापालिकेकडे तक्रार केली. त्यानंतर आरोग्य विभागाची घंटागाडी घटनास्थळी पोहोचली, परंतु सुरुवातीला काहीही आढळले नाही.
दरम्यान, स्वच्छतागृह साफसफाईसाठी आलेल्या कर्मचाऱ्याला दुर्गंधीचा संशय आल्याने त्याने पोलीस मुख्यालय परिसरात पाहणी केली. त्यावेळी सुरक्षा भिंतीलगत कुजलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळून आला. यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
प्राथमिक तपासात मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असल्याचे समोर आले आहे. मृतदेह सुमारे १० ते १५ दिवसांपूर्वीचा असल्याचा अंदाज असून चेहरा पूर्णतः कुजलेला आहे. मृताच्या अंगावर क्रिकेट सामन्याचे नाव असलेला टी-शर्ट व काळी पॅन्ट होती. तसेच उजव्या हाताला दोरा बांधलेला आढळला.
तपासादरम्यान, संबंधित कपडे काही दिवसांपूर्वी एका तरुणाच्या वडिलांनी अर्धनग्न अवस्थेत बसलेल्या भिकाऱ्याला दिल्याची माहिती समोर आली आहे. परिसरातील सुरक्षा रक्षकांनीही अशाच व्यक्तीला त्या भागात फिरताना पाहिल्याचे सांगितले. त्यामुळे मृत व्यक्ती भिकारीच असावा, असा पोलिसांचा कयास आहे.
दरम्यान, मृतदेह पोलीस वसाहतीत कसा आला याबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. रस्त्यावरून कोणी मृतदेह फेकला असावा किंवा भिंत ओलांडताना तो खाली पडला असावा, अशी चर्चा आहे. तसेच परिसरात सुरू असलेल्या बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांचीही चौकशी करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयताची ओळख पटविण्यासाठी आणि मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.





















