जळगाव मिरर | २१ डिसेंबर २०२५
वरणगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रस्थापित राजकीय शक्तींना जोरदार धक्का बसला असून, अपक्ष उमेदवार सुनील काळे यांनी भरघोस मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयामुळे वरणगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पक्षाने सुरुवातीपासूनच आघाडी घेत मुसंडी मारल्याचे दिसून आले. एकूण २१ जागांपैकी भाजपचे १४ उमेदवार विजयी झाले असून, नगरपरिषदेत भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. शिवसेना (ठाकरे गट) चे पाच उमेदवार विजयी झाले असून, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले आहेत.
मात्र, या निवडणुकीतील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा निकाल म्हणजे अपक्ष उमेदवार सुनील काळे यांचा विजय होय. प्रस्थापित उमेदवारांना पराभूत करत त्यांनी मिळवलेला हा विजय मतदारांमध्ये बदलाची आणि असंतोषाची भावना दर्शवणारा मानला जात आहे.
निवडणूक निकाल जाहीर होताच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. तर अपक्ष सुनील काळे यांच्या समर्थकांनीही मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला. आगामी काळात वरणगाव नगरपरिषदेतील सत्तासमीकरण आणि कारभार कसा राहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





















