जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२४
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील शिरूड (ता. अमळनेर) येथील उपसरपंच कल्याणी प्रफुल्ल पाटील यांनी जवळपास आठ मिनिटे संवाद साधला होता. त्याबद्दल त्यांचा सन्मान भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांनी केला.
ग्रामविकासाला चालना देत असताना शिरूडच्या उपसरपंच कल्याणी पाटील यांनी जलसंधारण, मृदसंधारण, सेंद्रिय शेती यावर विशेष भर दिला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत त्यांनी अमळनेर येथे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी गावात विविध उपक्रमांवर विशेष भर देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. जलजीवन मिशन, अटल भूजल, स्वच्छ भारत मिशन या केंद्र सरकारच्या योजनांमध्येही जनजागृती करून लोकसहभाग वाढविला. त्यातूनच शासकीय योजनांना यश मिळत गेले. कल्याणी पाटील यांनी गावात केलेल्या कार्याची दखल घेतली जावी म्हणून राष्ट्र विकास संस्थेचे अध्यक्ष भूपेंद्र महाले यांच्या प्रयत्नातून पीएम कार्यालयाकडे त्यांचे नाव पाठवण्यात आले होते. त्यानुसार कल्याणी पाटील यांच्याशी पंतप्रधानांनी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यांनी ग्रामविकासात केलेल्या कार्याची माहिती सुद्धा जाणून घेतली होती.
अमळनेर तालुक्यातील शिरुडसारख्या लहान खेड्यात राहून जलसंधारणात मोलाचे योगदान देणाऱ्या उपसरपंच कल्याणी पाटील यांनी पंतप्रधानांशी संवाद साधल्यानंतर त्यांचे आता सगळीकडे कौतूक होत आहे. त्याबद्दल भारतीय जना पक्षाने देखील त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी अमळनेर विधानसभा विस्तारक रावसाहेब पाटील, युवराज रायपूरकर, दिनेश पाटील, हिरालाल पाटील आदी उपस्थित होते.