बोदवड : प्रतिनिधी
नगरपंचायतीचा नगर विकास आराखडा (डीपी प्लॅन) पुढील २० वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी येथील महाविद्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बोदवड नगरपंचायत हद्दीचा शहर विकास आराखडा तयार करण्याचे काम राज्य शासनाने नियुक्त केलेल्या आर्वी असोसिएशन हैदराबाद या संस्थेस देण्यात आले आहे. नगर रचना अधिकारी म्हणून नगर रचना आणि मूल्यनिर्धारण कार्यालय जळगावचे सहाय्यक संचालक रा.म. पाटील यांची नियुक्ती केली आहे. हा प्रारूप विकास योजना आराखडा तयार करण्यासाठी शासनातर्फे १ हजार कोटींच्या निधीची तरतूद केल्याची माहिती यावेळी पाटील यांनी दिली. बोदवड शहराचा नगर विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. प्रारूप विकास योजना जीआयएस प्रणालीद्वारे जमीन वापर नकाशा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या बैठकीत, नगराध्यक्ष आनंदा पाटील, मुख्याधिकारी आकाश डोईफोडे, सूरज सूर्यवंशी, विकास कोटेचा, नगरसेवक, व्यापारी, डॉक्टर उपस्थित हाेते.
शुक्रवारी झालेल्या बैठकीस शहरातील शेतकरी, सर्व अधिकारी, स्थानिक नागरिक, वैद्यकीय, शिक्षण, व्यापारी अशा विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. यावेळी नगर रचना अधिकारी पाटील यांनी जनतेशी संवाद साधला. तुमच्या शहराच्या काय गरजा आहेत व आपले शहर कसे सुंदर व चांगले राहील, आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करता येतील यासाठी सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन अपेक्षित आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या शहर विकास आराखड्याबाबत आपली भूमिका मांडावी. मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच शहराची आताची व पुढील वीस वर्षांची लोकसंख्या विचारात घेऊन या सर्व योजना राबवण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
विविध वापरासाठी झोन प्रस्तावित करणे, सार्वजनिक वापरासाठी जमिनीचे आरक्षण, वाहतूक व दळणवळण, पाणीपुरवठा, मलनि:सारण, घनकचरा वीज इत्यादी सुविधांसाठी विविध तरतुदी करणे, सार्वजनिक सोयी सुविधांसाठी जागेची तरतूद करणे, औद्योगिक क्षेत्रासाठी जागेची तरतूद करणे व नैसर्गिक सौंदर्य स्थळांचे संरक्षण व संवर्धन कसे होईल, याकडे लक्ष देणे यासाठी या शहर विकास आराखड्यामध्ये विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. त्यामुळे बाेदवड शहराचा सर्वांगीण विकास अपेक्षित अाहे.