
जळगाव मिरर | ८ मे २०२५
देशभरातील अनेक भाविक चारधाम यात्रेसाठी निघाले असतांना नुकतीच एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. चारधाम यात्रेदरम्यान गुरुवारी उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगोत्रीजवळ सात सीटर हेलिकॉप्टर कोसळलं. या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली. सध्या पथकाकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस, आर्मी, आपत्ती व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिका आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारीही दाखल झाले आहेत.
गंगानीपासून पुढे नाग मंदिराच्या खाली भगीरथी नदीजवळ हेलिकॉप्टर कोसळले आहे. अपघात ग्रस्त हेलिकॉप्टर खासगी कंपनी एरो ट्रिंकचे होते. हेलिकॉप्टरमधून पायलट आणि सहा भाविक प्रवास करत होते. पायलटचं नाव कॅप्टन रॉबिन सिंह असं आहे. तर सहा प्रवाशांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मात्र हा अपघात कसा झाला, याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
उत्तराखंडमध्ये ३० एप्रिलपासून चार धाम यात्रा सुरू झाली आहे. चारधाम यात्रेसाठी लाखो भाविक उत्तराखंडला येत आहेत. याचदरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये खराब हवामान आहे. हवामान विभागानेही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. चारधाम यात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी पाऊस झाला असून काही ठिकाणी गारपीटही झाली आहे.