जळगाव मिरर | १९ जुलै २०२३
जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील बस व ट्रक अपघाताची घटना ताजी असतांना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा धरणगाव तालुक्यातील गावाजनीक भरधाव चारचाकीचे टायर फुटल्याने रोडवरील भिंतीला आदळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तर या अपघातात तीन ते चार जण किरकोळ जखमी असल्याचे देखील समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील शेख अफसर शेख तय्यब हे आपल्या परिवारासोबत बुधवारी १९ जुलै रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास चारचाकीने धरणगावकडून अमळनेर येथे जाण्यासाठी निघाले असतांना चारचाकीच्या पुढील शीटवर शरीफाबी शेख तय्यक (वय-७०) बसलेल्या होत्या. धरणगाव तालुक्यातील चांदणी कुऱ्हा गावानजीक भरधाव चारचाकीचे अचानक मुख्य रस्त्यावर टायर फुटले. त्यामुळे शेख अफसरचा चारचाकीचा ताबा सुटला आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर आदळली. यात शरीफाबी या महिला गंभीर जखमी झाल्या. स्थानिक गावकरी आणि वाहनधारकांच्या मयतीने जखमी महिलेला बाहेर काढून तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून मयत घोषीत केले. दुपारी अडीच वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.