
जळगाव मिरर | २२ मार्च २०२६
मोबाइल टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने उलगडलेल्या या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीकडून तब्बल १७० लिटर चोरीचे डिझेल जप्त केले आहे.
ही घटना जळगाव तालुक्यातील तरसोद येथील आसोदा रोडवरील जिओ कंपनीच्या मोबाइल टॉवरवर घडली होती. १६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री चोरट्याने टॉवरच्या जनरेटरचे नुकसान करून सुमारे १५ हजार ९३४ रुपयांचे डिझेल चोरून नेले होते. याप्रकरणी कंपनीचे सुपरवायझर विजय नगराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान सहाय्यक फौजदार राजेश मेंढे यांच्या पथकाने घटनास्थळावरील टॉवर डेटा, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि एसआरडीच्या साहाय्याने तांत्रिक पुरावे गोळा केले. या माहितीचे बारकाईने विश्लेषण केल्यानंतर संशयाची सुई अकोला जिल्ह्यातील राणेगाव येथील मूळ रहिवासी आणि सध्या जळगावच्या पिंप्राळा भागात वास्तव्यास असलेल्या श्याम सुभाष कुकडे (वय ३८) याच्याकडे वळली.
पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले १७० लिटर डिझेल जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.




















