जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२४
टीव्ही, इंटरनेट, मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या जगात जन्माला येणारी नवी पिढी आधीपेक्षा वेगळी आहे, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि सहाजिकपणे त्यांचे समस्या सोडवण्याचे मार्गही वेगळे आहेत. अशा परिस्थितीमध्ये आजच्या काळात मुलांचे संगोपन करताना, त्यांच्यावर संस्कार करताना पालकांच्या समोर नक्की काय आव्हाने आहेत हे आधी जाणून घेतले पाहिजे आणि पालक म्हणून आपण कुठे चुकत आहोत, याचे मूल्यमापन करून स्वत:मध्ये बदल घडवला पाहिजे. असे प्रतिपादन नागपूर येथील प्रसिद्ध ज्येष्ठ बाल मानसोपचार तज्ज्ञ व लाईफ कोच डॉ. रोझिना राणा यांनी सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे पालकांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा उपस्थित होते. जैन युवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी सर्व उपस्थित पालकांचे स्वागत करत सांगितले की, पालकांनाही ‘शिक्षण नेमके कशासाठी व आपली भूमिका काय’ याबाबत मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली असून आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती उत्तम असून तंत्रज्ञानाबाबत त्यांना बऱ्याच गोष्टी न शिकवता ते स्वतः शिकतात. हीच बाब त्यांनी अभ्यासातही केली पाहिजे. यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होईल.
पालकांनीदेखील आपल्या मुलाच्या स्कूलमधील अभ्यासाबाबत वेळोवेळी चौकशी केली पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे तसेच त्यांनी यावेळी महाविद्यालय व स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांच्या सोयी तसेच शेक्षणिक सुविधा व रोजगाराभिमुख शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. यानंतर सजग पालकत्व ‘ व्याख्यानात पालकांना मार्गदर्शन करतांना डॉ. रोझिना राणा पुढे म्हणाल्या कि, आजच्या काळात ‘मुलांना वाढवणं’ हे आव्हानात्मक आणि अत्यंत कठीण असं एक प्रकारचं ‘काम’ आहे असा चिंतेचा सूर आजच्या तरुण पालकांमध्ये असलेला दिसतो. पण खरं तर, पालकत्वाशी निगडित काही मूलभूत गोष्टी समजून घेतल्या तर हा अनुभव खूपच आनंददायी ठरू शकतो. पालक म्हणून मुलांना वाढवताना होणार्या चुका ओळखून, त्या वेळीच कशा दुरुस्त कराव्यात याचं उत्कृष्ट मार्गदर्शन करतांना डॉ. राणा यांनी काही कळीचे मुद्देही विचारात घेतले जसे कि, मुलांचं भावविश्व कसं जपावं ?, मुलांमध्ये आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा आणि आत्मप्रतिमा कशी निर्माण करावी?, मुलांचा अभ्यास व वर्तनासंदर्भातील समस्या कशा हाताळाव्यात? ‘३ Idiots ’ अर्थात टी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट या तीन ‘अविभाज्य घटकांशी’ कसा सामना करावा? या विविध बाबी मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करत असताना आलेल्या अनुभवातून आणि अभ्यासातून डॉ. राणा यांनी पालकांसमोर मांडले. सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. अंजली बियाणी,शमा पाटील व अल्फिया लहरी तसेच आभार जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी मानले तसेच जैन युवा फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर राका, कोषाध्यक्ष शैलेश गांधी व सचिव तेजस जैन यांचे सहकार्य लाभले. सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी यांनी कौतुक केले.