
जळगाव मिरर | ९ एप्रिल २०२६
जळगाव तालुक्यातील खेडी गावात किरकोळ कारणावरून झालेला वाद हिंसक वळणावर गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून विक्रांत वासुदेव राणे (वय २०) या तरुणावर दोघांनी लोखंडी कड्यासह स्टीलच्या ब्लेडने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना ६ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रांत राणे हा खेडी गावात वास्तव्यास असून तो शिक्षण घेत आहे. घटनेच्या दिवशी गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून संशयित जितू पाटील व निखील पाटील यांनी त्याच्याशी वाद घातला. सुरुवातीला त्यांनी विक्रांतला चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर वाद अधिक चिघळत गेल्याने दोघांनी लोखंडी कड्या व स्टीलच्या ब्लेडने त्याच्यावर वार केले. या हल्ल्यात विक्रांत गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
घटनेनंतर विक्रांत राणे याने ७ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार संशयित जितू पाटील व निखील पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दीपक महाजन करत असून, संशयितांच्या अटकेसाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





















