जळगाव मिरर | १० जुलै २०२६
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) च्या स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त अभाविप जळगाव महानगरच्या वतीने शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये सुमारे ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विवेकानंद प्रतिष्ठानच्या सर्व शाळा, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, जळगाव, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग महाविद्यालय, जळगाव, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे आय.एम.आर. महाविद्यालय तसेच गव्हर्नमेंट आय.टी.आय., जळगाव येथे विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा देत शुभेच्छा कार्डांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी, चारित्र्यनिर्माण आणि विद्यार्थी हिताची भावना दृढ करणे तसेच अभाविपच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा होता. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले.
अभाविप ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी देशातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असून, शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रनिर्माणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून हा शुभेच्छा कार्ड वितरण उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमात अभाविप जळगाव महानगरचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.





















