जळगाव मिरर | ११ नोव्हेंबर २०२५
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या अनुदानात मुक्ताईनगर तालुक्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी तत्काळ कारवाई करत दोन तलाठी, एक महसूल सहाय्यक यांनी निलंबित केले आहे. दरम्यान या प्रकरणी उंचदा येथील कोतवालास अटक करण्यात आले आहे.
ही कारवाई आ. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली. आ. पाटील यांनी अनुदान वितरणात लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करत संबंधित कागदपत्रांसह पुरावे महसूल प्रशासनाकडे सादर केले होते. या आरोपांवर जिल्हाधिकारी घुगे यांनी तातडीने चौकशी समिती स्थापन करून प्रकरणाची सखोल तपासणी केली. समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त होताच सोमवारी तीन कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. यात बोरखेडा (ता. मुक्ताईनगर) तलाठी महेंद्र वंजारी, उंचदा येथील तत्कालीन तलाठी कृष्णकुमार ठाकूर (सध्या पारोळा येथे सेवारत) व मुक्ताईनगर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक मनीष बेंडाळे यांचा समावेश आहे. या प्रकरणात उचंदा येथील कोतवाल राहुल सोनवणे यांना दि. ९ रोजी अटक करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाने थेट खात्यावर (डीबीटी प्रणालीद्वारे) मदत देण्यात येत आहे. मात्र, काही कर्मचाऱ्यांनी याचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांच्या नावाने बनावट नोंदी करून लाखो रुपयांचे अनुदान अपहार केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनातील पारदर्शकतेसाठी कडक पावले उचलत तात्काळ निलंबनाचा आदेश दिला. या घटनेनंतर महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे



















