जळगाव मिरर | २८ सप्टेंबर २०२४
यावल तालुक्यातील मनवेल येथे भंडाऱ्याच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद झाला होता, अन् या वादाचे रूपांतर शिरागड गावात हाणामारीत झाले. यात एका २२ वर्षीय तरुणावर तिघांनी प्राणाघातक हल्ला केला. ही घटना २५ सप्टेंबरला रात्री घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून यातील एकाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरागड येथील रहिवासी गणेश राजू सोळुंके (वय २२) हा तरुण मनवेल या गावातील भंडाऱ्याच्या कार्यक्रमात गेला होता. तेथे नाचण्यावरून त्याचा वाद झाला होता. या वादाचे रूपांतर शिरागड गावात २५ रोजी हाणामारीत झाले. शिरागड येथे गणेश सोळुंके याला ताराचंद व्यंकट सोळंके, कैलास व्यंकट सोळंके व प्रशांत कैलास सोळंके या तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्याच्या पाठीवर व कमरेला धारदार वस्तूने वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर गणेश सोळुंके या तरुणाला जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे. यातील ताराचंद सोळंके याला पोलिसांनी अटक केली आहे. तपास पो.नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत.