जळगाव मिरर | २२ जून २०२३
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा हत्या प्रकरणातील संशयित राहुल हंडोरेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर दर्शना पवार हिच्या आईने आणि भावाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
त्याने माझ्या बहिणीचा घात केला. आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्यथा मारून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया दर्शनाच्या भावाने व्यक्त केली आहे तर माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे त्याचे करू द्या, माझ्या मुलीला मीच न्याय देऊ शकते, अशा शब्दांत तिच्या आईने संताप व्यक्त केला आहे. दर्शनाच्या अशा प्रकारे निर्घृण हत्या झाल्याने पवार कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. लेकीने MPSC प्रचंड मेहनतीने पास केली होती. त्यानंतर तिची RFO म्हणून निवड झाली होती. त्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. सगळीकडे तिचं आणि कुटुंबियांचं अभिनंदन करण्यात येत होतं. मात्र पुरस्कार स्विकारण्यासाठी आली आणि तिचा राहुलने घात केला. राहुल नातेवाईकांमधला असल्याने तिचं कुटुंबीय आता जास्त आक्रमक झालं आहे. त्यांनी थेट राहुलला फाशी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
दर्शना पवारची आई म्हणते की, माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे त्याचे करू द्या. मला माझ्या मुलीला न्याय द्यायचा आहे आणि तो मीच देऊ शकते. माझी मुलगी गेली आहे तशा इतरांच्या मुली जाऊ नये. यासाठी राहुलला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. राहुलला शिक्षा देण्यासाठी मी समर्थ आहे त्याला आमच्या ताब्यात दिलं पाहिजे. नाहीतर सरकरानेच त्याला फाशी दिली पाहिजे. तर दर्शना पवारचा भाऊ म्हणतो की, राहुलमुळे माझ्या बहिणीला खूप त्रास झाला आहे. त्याच्यामुळे आमची धडधाकट बहिण गेली. त्यामुळे तुम्ही त्याला मारा नाहीतर आमच्याकडे सोपवा, अशी माझी सरकारला विनंती आहे.




















