जळगाव मिरर | २५ नोव्हेंबर २०२६
शेतीच्या वादातून लोखंडी पाईप डोक्यात मारुन डॉ. संजय धनराज तेली (वय ५०, रा. कन्नड, जि. छ. संभाजी नगर) यांचा खून करुन मृतदेह बहुळा नदीत फेकून दिला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्रे फिरवित खून करणाऱ्या राहुल धर्मा पाटील (वय ४५) व संजय वामन भिल्ल (वय ५५, दोघ रा. गोराडखेडा, ता.पाचोरा) यांच्या मुसक्या आवळून हा गुन्हा उघडकीस आणला.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड येथील डॉ. संजय तेली हे पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे शेतीचा व्यवहार करण्यासाठी आले होते. परंतू त्यांच्यासोबत संपर्क होत नसल्याने दि. १८ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मित्राने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे अपहरण झाल्याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना दिली. त्यानुसार उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांचे पथकाकडून तपास केला जात होता.
पथकाला मिळालेल्या माहितीनुसार डॉ. संजय तेली हे शेतीच्या व्यवहाराकरीता गोराडखेडा येथे आले असता, याठिकाणी राहुल पाटील याच्यासोबत वाद झाल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी संशयित राहुल पाटील याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपणच लोखंडी रॉड डोक्यात मारुन संजय तेली यांचा खून केल्याची कबुली दिली. तसेच पुरावा नष्ट करण्याकरीता त्यांच्या शेतातील सालदार संजय भिल्ल याच्या मदतीने मृतदेह गोणीत भरुन तो बहुळा नदीत फेकल्याचे सांगितले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पाचोरा विभागाचे उपअधीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राहुल गायकवाड, पाचोरा पोलीस ठाण्याचे पोनि राहुल पवार यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, रतन गिते, ईश्वर पाटील, भूषण पाटील, बाबासाहेब पाटील, दिलीप वाघमोडे यांच्या पथकाने केली.
मृतदेह बहुळा नदीत फेकल्याचे सांगितल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने पाचोरा पोलिसांच्या मदतीने बहुळा नदीपात्रात शोध मोहीम राबविली. पोलिसांना नदीपात्रात पाण्यावर तरंगतांना मृतदेह मिळून आल्यानंतर पोलिसांनी तो बाहेर काढला. त्यानंतर शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन केला. याप्रकरणी अपहरणाच्या गुन्ह्यात खूनाचे कलम वाढविण्यात आले असून पुढील तपास सपोनि प्रदीप शेवाळे हे करीत आहे.



















