जळगाव मिरर | २७ नोव्हेबर २०२३
प्रत्येक व्यक्तीला चहा पिण्याची सवय असतेच पण एका तरुणाला चहा पिणे खूप महागात पडले आहे. पुणे शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास झाडाखाली चहा पीत उभ्या असलेल्या एका तरुणाच्या डोक्यावर अचानक झाडाची फांदी कोसळली. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. घडली. अभिजित गुंड (३२, रा. कसबा पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित गुंड हा तरुण रविवारी सायंकाळी चहा पिण्यासाठी ओंकारेश्वर मंदिर परिसराखाली असलेल्या टपरीवर आला होता. चहा घेताना तो मित्रांसोबत निवांत गप्पा मारत होता. त्यावेळीच झाडावरून अचानक वाळलेली फांदी कोसळली. ही फांदी अभिजित याच्या डोक्यावर पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत. दरम्यान, अभिजितच्या मृत्यूला विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयाचे तसेच गार्डन विभागाचे अधिकारी सर्वस्वी जबाबदार आहेत, असा आरोप अभिजितच्या मित्रांनी केला आहे. सर्व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा करण्यात यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.