
जळगाव मिरर | २४ मार्च २०२६
बांभोरी येथील रेल्वे पुला खाली रहाणाऱ्या दोन मित्रामध्ये पैशा वरून वाद झाला याचे पर्यावसन हाणामारीत झाले. या वेळी मित्र मयत झाला असून तो काही हालचाल करीत नाही, असे लक्षात आल्याने मयताचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला. मित्राला खून प्रकरणी पाळधी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथून जवळच असलेल्या बांभोरी गावातील रेल्वे पुला खाली पिंटू बारेला, त्याची पत्नी सखूबाई बारेला, सुनिल बारेला सर्व रा. वरला जि. बडवानी व कैलास बारेला रा. पांढरी ता. चोपडा हे रेल्वे लाईनवर पडलेले खाली बाटल्या व ईतर साहित्य गोळा करून आपला उदरनिर्वाह करतात व त्या पुलाखालीच झोपडी मध्ये राहतात. काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांना काही पैसे मिळाले त्यातून दारू पिऊन ते जेवण करीत असताना सुनिल बारेला याने पिंटू बारेला याला तू माझे पैसे व मोबाईल घेतला असे म्हणून त्याचेशी वाद घातला या वेळी सुनिल बारेला याने पिंटू बारेला याला काठी व दगडांनी मारहाण केली या वेळी त्याची पत्नी सखूबाई ही मध्ये आली असता त्याने तिला ही मारहाण केली यात ती जखमी झाल्याने ती तेथून निघून गेली याच वेळी सुनील याने पिंटू यास चाकू मारल्याने तो निपचित पडला त्याने लगेच त्याला रेल्वे लाईनवर फेकून अपघात झाल्याचा बनाव केला मात्र रात्री गस्तीवर असलेले रेल्वे लाईन मन यांनी त्याची खबर पाळधी रेल्वे स्थानकावर दिली तेथील स्टेशन मास्तर यांनी पाळधी पोलीस चौकी येथे माहिती दिली असता त्यांनी लागलीच तेथे धाव घेतली या वेळी त्याचा पत्नीने मृतदेह ओळखला व सुनिल बारेला याने खून केल्याचे सांगितले. पोलिसांना पाहून सुनिल बारेला पळू लागला मात्र पाळधी पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले
घटनेची माहिती मिळताच चोपडा भागाचे पोलीस उप विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, धरणगाव पोलीस ठाण्याचे पो. नि. सुनिल पवार, पाळधीचे स. पो. नि. प्रशांत कंडारे यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ही येऊन पुरावे गोळा करण्यात आले. या बाबत सखुबाई बारेला यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पाळधीचे स. पो. नि. प्रशांत कंडारे व त्यांचे सहकारी करीत आहेत. सुनिल बारेला याला पाळधी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.




















