जळगाव मिरर | १० डिसेंबर २०२५
शहरातील मेहरुण परिसरातील आदित्य चौकात दि. ७ रोजी रात्रीच्या सुमारास मद्यपान करून नशेत तर्रर्र झालेल्या एका २८ वर्षीय महिलेने भर चौकात जोरजोरात आरडाओरड करीत गोंधळ घातला. तेथून जात असलेलया वाहनांना अडवून दुचाकींची तोडफोड केली. महिलेला काहीही भान नसल्याने ती अनेक वेळा तोल जाऊन खाली पडली व पुन्हा उठून शिवीगाळ करीत गोंधळ घातला. याप्रकरणी महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की , शहरातील रामेश्वर कॉलनीतील रहिवासी असलेली २८ वर्षीय महिला कोठून तरी मद्यपान करून रात्री आदित्य चौकात आली. ती रस्त्यावर उभे राहत तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी ती जोरजोरात आरडाओरत करीत तिने रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांच्याशी गैरवर्तन केले. एवढ्यावर न थांबता तिने शिवीगाळ करीत दुचाकींची तोडफोडही केली. या प्रकाराविषयी काही नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.
त्या वेळी तेथे पथक पोहचले असता महिला नशेत तर्रर्र होती नशा एवढा होता की, तिला उभेही राहता येत नव्हते. पोलिस व नागरिकांनी तिला समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अखेर पोलिसांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले व वैद्यकीय तपासणी केली. त्यात तिने मद्यपान केल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. या प्रकरणी पोकॉ रवींद्र पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सदर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक पंकज पाटील करीत आहेत.




















