जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२४
जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकमॅनच्या सतर्कतेने व तत्परतेने एका प्रवाशाचे प्राण वाचवले. ही घटना ट्रेन क्रमांक १२८३३ (अहमदाबाद -हावडा) जळगाव स्थानकावरून सुटत असताना आज सकाळी ११ वाजता गाडी जळगाव स्थानकावरून इ ५ कोचच्या दरवाजा जवळ एक प्रवासी लटकत होता. प्रवाशाचे पाय ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या दरम्यान फसले होते व त्याला घसरत जाताना पाहून इंजिनिअरिंग विभागातील ट्रॅकमॅन गजानन बाबूसिंह पाटील, युनिट क्रमांक १२ जळगाव यांनी त्वरित धाव घेत प्रवाशाला सुरक्षित बाहेर ओढून त्याचे प्राण वाचवले.
घटनेनंतर रेल्वे सुरक्षा बलचे एएसआय शिवपूजन सिंग यांनी प्रवाशाची चौकशी केली. प्रवाशाचे नाव प्रकाश रामचंदानी (वयः ५८) असून ते नांदुरा, जि. बुलढाणा येथील रहिवासी असल्याचे सांगितले. रामचंदानी यांनी जळगाव ते नांदुरा प्रवासासाठी पास घेतला होता. त्यांना तातडीने वैद्यकीय तपासणीचा सल्ला देण्यात आला, परंतु त्यांना कोणतीही शारीरिक अस्वस्थता वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांची प्रवासाची गाडी सुरू ठेवण्यात आली.
रेल्वे प्रशासनाने ट्रॅकमॅन गजानन बाबूसिंह पाटील यांच्या या साहसिक व तत्परतेच्या कार्याचे कौतुक केले आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे एक मोठा अपघात टळला असून प्रवाशांचा रेल्वेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.