जळगाव मिरर | १० नोव्हेंबर २०२६
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील फुलगाव उड्डाणपुलाखाली १ नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील गंभीर जखमी सरफराज सय्यद बशीर सय्यद (वय २५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांपासून जळगाव येथील जिल्हा वनीता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे गोळीबाराचे प्रकरण आता हत्येच्या गुन्ह्यात रूपांतरित झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे.

१ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ७ वाजता सरफराज हे फुलगाव उड्डाणपुलाखाली आपल्या दुचाकीजवळ उभे होते. याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर दोन ते तीन राऊंड गोळीबार केला. यातील एक गोळी सरफराज यांच्या खांद्याला लागली, तर त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडनेही जोरदार वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना घटनास्थळी सोडून हल्लेखोर मोटारसायकलवरून पसार झाले होते. घटनेनंतर सरफराज यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न अपुरे पडले आणि ८ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या २५ वर्षांच्या तरुणाची गोळीबार करून हत्या झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रकरणात पोलिसांनी भूषण ऊर्फ बिस्ला राजू सावळे (वय २०) आणि सिद्धार्थ रामदास डिवरे (वय २७, दोघे रा. फेकरी) यांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींना भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण काय, सरफराज यांच्यावर हल्ला करण्यामागे जुने वैमनस्य होते की अन्य काही कारण, तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
भररस्त्यात गोळीबार करून तरुणाची हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अटक केलेल्या आरोपींकडून हत्येमागील कारण आणि कटातील इतर सहभागींची माहिती उघड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल करीत आहेत




















