जळगाव मिरर | १७ सप्टेंबर २०२४
आत्ताच एमपीडीएमधून सुटून आलो आहे, पाच बार लुटले तरी माझे कोण काही वाकडे करु शकले नाही असे म्हणत चाकूचा धाक दाखवून चौघांनी बारच्या गल्ल्यातून ५ लाख ७० हजारांची रोकड जबरीने लुटून नेली. तसेच दगडफेक करुन बारचे नुकसान केले. ही घटना गुजराल पेट्रोलपंपा शेजारील शंकर प्लाझामध्ये रविवारी रात्री सव्वाआठ वाजता घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एका संशयिताला रामानंद नगर पोलिसांनी अटक केली असून उर्वरीत तिघे फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजराल पेट्रोल पंपाशेजारील शंकर प्लाझामध्ये एन. एन. वाईन अॅण्ड बार असून त्याठिकाणी अमोल संतोष कोळी हा तरुण मॅनेजर म्हणून नोकरीस आहे. रविवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास सचिन चव्हाण, राकेश जाधव, भोला उर्फ सुगर भोई, अक्षय उर्फ गंप्या राठोड हे त्याठिकाणी आले. त्यांनी पाच बियरची मागणी केली. परंतु मॅनेजरने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली असता, त्यांच्याकडून शिवीगाळ करण्यात आली. तसेच मी कोण आहे? आत्ताच एमपीडीएमधून सुटून आलो आहे, असे म्हणत ते बारमध्ये शिरले. त्यांनी ग्राहकाच्या हातातील बियरची बाटली ग्राहकाच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले.
ग्राहकांमध्ये पळापळ झाल्याने सचिन चव्हाण याच्यासह त्याच्या साथीदारांनी बारवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सचिन चव्हाण, अक्षय उर्फ गंप्या राठोड हे कॅश कऊंटरजवळ गेले आणि त्यात असलेली ५ लाख ७० हजार रुपयांची रोकड जबरीने लुटून नेत ते तेथून पसार झाले. याप्रकरणी मॅनेजर अमोल कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलिसात रविवारी रात्री चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, यातील संशयित भोला उर्फ सुगर भोई याला रामानंद नगर पोलिसांनी अटक केली असून पैसे घेवून पसार झालेल्या तिघांचा शोध घेतला जात आहे.
