जळगाव मिरर | १८ फेब्रुवारी २०२५
राज्याच्या राजकारणात खळबळ माजविणारी बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही अटक नागपूर न्यायालयाच्या आदेशानुसार झाली आहे. सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात अनेक वॉरंट निघूनही त्यांनी न्यायालयात हजेरी लावली नव्हती. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आले होते.
सविस्तर वृत्त असे कि, नागपूर पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांना ताब्यात घेतले असून सध्या त्यांना नागपूरच्या मेयो या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले आहे. न्यायालयाने हर्षवर्धन जाधव यांना तुरुंगात नेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांकडून कायदेशीर कारवाई होत असून जाधव यांना रीतसर अटक करून तुरुंगात पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हर्षवर्धन जाधव यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना पुढील 24 तासांसाठी पोलिसांकडून अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. हर्षवर्धन जाधव यांनी छातीत वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे 2024 मध्ये नागपूरच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा एका हॉटेलमध्ये त्यांना भेटण्यासाठी हर्षवर्धन जाधव जात असताना त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी अडवले होते. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी पोलिसांशी वाद घातला होता. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्यावर 353 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यासाठी पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 5 जानेवारी 2011 साली वेरूळ लेणीला भेट देण्यासाठी आणि वेरूळच्या पर्यटन केंद्रामध्ये असलेल्या शासकीय बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी हर्षवर्धन जाधव गेले होते. यावेळी एका पोलिस कर्मचाऱ्यासोबत त्यांची झटापट झाली होती. यावेळी पोलिसाला मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली होती.
पोलिस निरिक्षक धनंजय येरुळे यांनी तपास पूर्ण करून 10 मार्च 2011 रोजी न्यायालात दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणीअंती न्यायालयाने आमदार जाधव यांना दोषी धरले. सरकारी कामात अडथळा आणणे व शासकीय कर्मचाऱ्यांना जखमी केल्याच्या कलमांतर्गत जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यावेळी, औरंगाबाद खंडपीठाने जाधव यांना 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन देखील मंजूर केला होता.