
जळगाव मिरर | ९ एप्रिल २०२६
अमळनेर तालुक्यासह संपूर्ण नाशिक विभागात बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणात अमळनेर तालुक्यातील विविध शाळा व संस्थांमधील सुमारे १०० जणांना चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या असून, नाशिक विभागात एकूण ८९२ शालेय कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
या घोटाळ्याची गंभीरता लक्षात घेता शिक्षण विभागाने उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीत नवी मुंबई, वाशी येथील विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, कोल्हापूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, लातूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, शिक्षण परिषदेचे सहसंचालक देवीदास कुलाळ आणि पुणे शिक्षण मंडळाचे औदुंबर उकिरडे यांचा समावेश आहे. समितीमार्फत सखोल चौकशी सुरू असून संबंधितांकडून कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.
मंगळवारी १७ तर बुधवारी जवळपास ७९ शिक्षक व संस्थांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नोटिसा मिळाल्यानंतर काही मुख्याध्यापकांनी अचानक रजा घेतल्याची माहिती समोर आली आहे, तर काहींनी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या प्रकरणाचे धागेदोरे अनेक शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचत असल्याचे समोर येत असून, काही संस्था राजकीय व्यक्तींशी संबंधित असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या घोटाळ्याचा तपास कोणत्या स्तरापर्यंत पोहोचतो आणि दोषींवर नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





















