जळगाव मिरर । ८ नोव्हेंबर २०२५
आधार कार्डचा गैरवापर करून ‘मनी लॉडिंग’ आणि दहशतवाद्यांना पैसा पुरवण्याच्या खोट्या आरोपाखाली मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचा बनाव करीत, सायबर गुन्हेगारांनी यावल तालुक्यातील सुरेश काशिराम नेहते (वय ६७, रा. बामणोद, ता. यावल) या वृद्ध शेतकऱ्याची ९ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार दि. १ नोव्हेंबर रोजी समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वरुत असे की , यावल तालुक्यातील बामणोद येथे सुरेश काशिराम नेहेते (वय ६७) हे वास्तव्यास असून ते शेतकरी आहे. दि. ३० ऑक्टोबर रोजी नेहेते यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. बोलणाऱ्या व्यक्तीने आपण मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचे सांगून, त्यांच्या आधार कार्डावर कॅनरा बँकेत खाते उघडून वीस कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे सांगितले. दि. ३१ ऑक्टोबर रोजी त्यांना पुन्हा व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला. यामध्ये एक व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात, पाठीमागे मुंबई पोलिसांचा लोगो दाखवत होता. ‘तुमच्यावर मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल असून, अटक वॉरंट निघाले आहे,’ असे धमकावले. ‘डिजीटल स्टडी’च्या नावाखाली व्हिडिओ कॉल चालू ठेवण्यास सांगितले.
कॉल करणाऱ्या ऑनलाईन ठगाने आपल्याला इतक्या दूर येणे शक्य नसल्याचे सांगितल्यावर आरोपींनी त्यांची आधार कार्ड, बँक पासबुक आणि मालमत्तेची माहिती घेतली. ‘तुम्ही निर्दोष सिद्ध झाल्यास पैसे परत मिळतील,’ असे सांगून आरटीजीएसद्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावावर एका ‘सिटी युनियन बँके’च्या खात्यात ९ लाख ५० हजार रुपये भरण्यास भाग पाडले. वृद्ध शेतकरी सुरेश नेहते यांच्या मुलाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दि. १ नोव्हेंबर रोजी सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध सायबर पोलीसत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



















