जळगाव मिरर | १९ जून २०२५
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथून जवळ असलेल्या विल्हाळा येथे शेतात मशागत करत असताना शेतकऱ्याचा ट्रॅक्टरवरील तोल जाऊन ते रोटरमध्ये अडकले. या भीषण अपघातात ते जागीच ठार झाले. कचरू उघडू सुरवाडे (वय ७०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना बुधवार दि. १८ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत वरणगाव पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, कचरू सुरवाडे यांनी बटाईने घेतलेल्या शेतात रोटरच्या सहाय्याने मशागतीचे काम सुरू केले होते. मात्र, काम करत असताना अचानक ट्रॅक्टरवरील तोल जाऊन ते खाली पडले आणि थेट रोटरमध्ये अडकले. या भीषण अपघातात त्यांचे हात आणि पाय कापले गेले, आणि त्यांनी घटनास्थळीच प्राण सोडले या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. गावात शोककळा पसरली असून, शेतकऱ्यांच्या कामाच्या धकाधकीत होणाऱ्या अशा अपघातांनी चिंता व्यक्त केली जात आहे. वरणगाव पोलिस स्टेशनचे अमित कुमार बागुल यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्रावण जवरे तपास करीत आहेत.
