जळगाव मिरर | १८ डिसेंबर २०२५
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर मुंडेंचा राज्य मंत्रिमंडळात पुन्हा प्रवेश होणार का, याबाबत तर्कवितर्क सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. “मुंडेंना पुन्हा मंत्री केले तर मी बीडमध्ये जाऊन उपोषण करेन,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. नाशिक न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी अचानक दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने, कोकाटे यांच्या जागी मुंडेंना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार का, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. “धनंजय मुंडे यांनी अमित शहा यांची भेट घेतली याचे मला वाईट वाटते. ज्या नेत्यावर गंभीर आरोप झाले आहेत, त्यांना केंद्रीय गृहमंत्री कशी काय भेट देतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुंडेंवरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झाले नसले तरी आरोपांमध्ये तथ्य नसते तर राज्य सरकारने त्यांचा राजीनामा का घेतला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याचे प्रयत्न झाले तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा देत सुळे म्हणाल्या की, “त्यांना मंत्री केले तर आम्ही बीडला जाऊन उपोषण करू आणि राज्यभरात मोठे आंदोलन छेडू.”
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला तसेच महायुती सरकारला कायदेशीर झटका बसला आहे. त्यातच आता धनंजय मुंडे यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशावरून शरद पवार गटाने थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्याने, आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र संघर्ष अटळ असल्याचे चित्र दिसत आहे.





















