जळगाव मिरर | २३ डिसेंबर २०२४
पाईप चोरी प्रकरणात अटकेत असलेल्या सुपरवायझरकडून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले होते. त्या पाठोपाठ आता रामानंद नगर पोलिसांनी शाम नगरातून पाईप चोरी करतांना गुन्ह्यात वापरलेला आयशर ट्रक जप्त केला आहे. हा ट्रक गुन्ह्यात वापरल्यानंतर तो ट्रक मूळ मालकाने दुसऱ्याला विकून टाकला होता. मात्र पोलिसांनी तपासचक्रे फिरवित तो ट्रक जप्त केला आहे.
भंगार साहित्याचे कंत्राटाच्या नावाखाली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ब्रिटीशकालीन बिडाच्या पाईप चोरीची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेता सुनिल सुपडू महाजन यांच्यासह सात जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात एक व तालुका पोलीस ठाण्यात दोन असे एकूण तीन गुन्हे दाखल आहे. या गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने तीन्ही गुन्ह्यांचा सखोल तपास करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र तपासणी (एसआयटी) पथकाची नेमणुक करण्यात आली असून ते या गुन्ह्याचा तपास करीत आहे.
गेल्या महिन्यात वाघ नगरातील शाम नगर परिसरातून गेलेले पाईप जेसीबीच्या सहाय्याने खोदून ते (एमएच ४८, जे ०१०५) क्रमांकाच्या आयशर ट्रकमधून त्याची वाहतुक केल्याची माहिती रामानंद नगर पोलिसांना संशयितांच्या चौकशीत समोर आली. पोलिसांनी त्या ट्रकचा शोध घेतला असता, तो ट्रक सुनिल हिरालाल सोनवणे (मूळ रा. भालशिव, ता.यावल, ह. मु. बीबानगर) याच्या नावावर होता. पोलिसांनी त्या ट्रक चालाकाची चौकशी केल्यानंतर त्याने तो ट्रक पंधरा दिवसांपुर्वीच सिकंदर हकीम पटेल रा. सुप्रिम कॉलनी याच्याकडून खरेदी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
पाईप चोरी प्रकरणात आतापर्यंत भंगार ठेकेदार सादीक खाटीक, अक्षय अग्रवाल, भावेश पाटील व सुपरयाझर कुंदन पाटील या चौघांना अटक करण्यात आली असून उर्वरीत तिघे मात्र अद्याप फरार आहे. पोलीस कोठडीत या संशयितांची चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरलेले पाईपाची विल्हेवाट कुठे लावली त्याची माहिती दिली. त्यानुसार तपासधिकाऱ्यांनी पाईपांच्या मोबदल्यात १३ लाख ४४ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आले.