
जळगाव मिरर | २९ सप्टेंबर २०२३
राज्यभर आज सकाळपासून बाप्पांच्या निरोपाची धामधूम सुरु असतांना एक दुर्देवी बातमी नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे. गणेश विसर्जनादरम्यान चार जण बुडाल्याचं वृत्त असून यांपैकी गोदावरी नदीत दोघांचा तर वालदेवी धरणाच्या पाण्यात दोन जण बुडाले आहेत. यामुळं नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील गाडगे महाराज पुलाजवळील गोदावरी नदीवरील घाटावर गणेशाच्या मुर्तीचं विसर्जन करण्यासाठी दोन तरुण पाण्यात उतरले होते. त्यांना पाण्याची खोलीचा अंदाज न आल्यानं ते पाण्यात बुडाले, महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून बोटीद्वारे शोध घेण्यात येत आहे. त्याचबरोबर वालदेवी धरणाच्या पाण्यात गणेश विसर्जनासाठी आलेल्या काही मुलांमधील दोघे इथल्या पाण्यात बुडाले. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास इथं दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. दरवर्षी इथं अशा प्रकारच्या घटना घडत असतात त्यामुळं यंदा विसर्जनासाठी इथं बंदी घातलेली असतानाही आदेश झुगारल्यानं ही दुर्घटना घडली आहे.