जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२५
राज्याच्या उपराजधानी नागपूरजवळील सावनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नोकरीचे आमिष दाखवून लग्नानंतर फसवणूक, छळ आणि तणावाला कंटाळून एका महिला कबड्डीपटूने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. माळेगाव टाउन येथील किरण दाढे (वय २७) यांनी कीटकनाशक प्राशन करून जीवन संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण दाढे आणि स्वप्नील जयदेव लांबघरे यांचे २०२० मध्ये लग्न झाले होते. लग्नापूर्वी किरण आणि तिच्या भावाला नोकरीची सोय करून देण्याचे आमिष स्वप्नीलकडून दाखवण्यात आले होते. आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी नोकरीची हमी त्यांना मदत करेल, या विश्वासाने किरण यांनी विवाहास होकार दिला होता. मात्र काही महिन्यांतच ही आश्वासने खोटी असल्याचे तिच्या लक्षात आले.
लग्नानंतर स्वप्नीलने नोकरीचे आश्वासन पूर्ण करण्यास टाळाटाळ सुरू केली. दरम्यान, त्याने किरणचा मानसिक तसेच लैंगिक छळ केल्याचा आरोप किरणच्या माहेरच्यांनी केला आहे. या त्रासाला कंटाळून किरण आपल्या पालकांच्या घरी परत आली होती. त्यानंतर तिला स्वप्नीलकडून वारंवार धमक्या, शिवीगाळ आणि त्रास दिला जात असल्याचेही नातेवाईकांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर स्वप्नीलने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला होता.
या सर्व घडामोडींमुळे किरण तीव्र नैराश्यात गेली होती. अखेर दिर्घकाळ सुरू असलेल्या मानसिक तणावाचा अंत करत तिने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. कुटुंबियांच्या लक्षात येताच तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. किरणचा मृत्यू हा परिसरातील रहिवासी आणि क्रीडा क्षेत्रासाठी धक्कादायक ठरला आहे. खेळाडू असूनही तिला सहन करावा लागलेला छळ आणि मानसिक ताण यावर व्यापक चर्चा सुरू झाली आहे. किरणच्या कुटुंबियांनी स्वप्नीलवर नोकरीच्या खोट्या आश्वासनांद्वारे लग्न करून फसवणूक केल्याचा, तसेच सतत छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पती स्वप्नील लांबघरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेने गावात आणि क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.





















