
जळगाव मिरर | ३० एप्रिल २०२५
वडीलांना मारहाण करीत त्यांचा पाय फ्रैक्चर केल्याचा राग मनात होता. त्यामुळे हा बदला घेण्यासाठी मित्राचा वाढदिवस साजरा करीत असलेल्या महेंद्र समाधान सपकाळे (वय २०, रा. प्रबुद्ध नगर, पिंप्राळा) यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांच्या रामानंद नगर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोहाडी येथून पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सविस्तर वृत्त असे कि, मित्राचा वाढदिवस साजरा करीत असलेल्या महेंद्र सपकाळे याच्यावर हातात कोयते आणि गावठी कट्टा घेवून आलेल्यांनी गोळीबार केला होता. यावेळी त्यांनी तीन राऊंड फायर केले होते. यावेळी महेंद्रच्या कमरेखाली गोळी लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. गोळीबार केल्यानंतर संशयित घटनास्थळाहून पसार झाले होते. गोळीबार करणाऱ्या विशाल कोळी याने गावठी कट्टा रामेश्वर कॉलनीत राहणारा त्याचा मित्र गिरीष घुगे याच्याकडे देवून तो पसार झाला होता. दरम्यान, पोलिस चौकशीत तो गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला. त्यानंतर तपासधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्रे फिरवित संशयित विशाल भिका कोळी, अक्षय उर्फ बाब्या बन्सीलाल धोबी, धिरज उर्फ वैभव उर्फ गोलू कोळी, सागर अरुण भोई उर्फ जाड्या भोल्या, नितेश मिलिंद व गिरीश किशोर घुगे यांच्या पहाटेच्या सुमारास मोहाडी गावातून मुसक्या आवळल्या. गोळीबार करणाऱ्या विशाल कोळी याच्याविरुद्ध ११ गुन्हे तर नितेश उर्फ गोल्या मिलींद जाधव यांच्याविरुद्ध तब्बल पंधरा गुन्हे दाखल आहेत. त्या दोघांविरुद्ध एमपीडीएतंर्गत कारवाई देखील करण्यात आली होती. तसेच अक्षय उर्फ बाब्या धोबी याच्याविरुद्ध आठ गुन्हे दाखल असून ते पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप वाघ, उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे, सफौ संजय सपकाळे, जितेंद्र राजपूत, पोहेकॉ जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, इरफान मलिक, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, विनोद सुर्यवंशी, उमेश पवार, रविंद्र चौधरी, प्रवीण सुरवाडे यांच्या पथकाने केली.