
जळगाव मिरर | २४ एप्रिल २०२५
दाम्पत्य घर बंद करुन लग्नाला गेलेले असतांना चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला. याठिकाणाहून त्यांनी ६० हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी शेजारी राहणाऱ्या सुरक्षा रक्षकाची दुचाकी चोरुन ते दुचाकीवरुन पसार झाले. ही घटना दि.२२ रोजी कोल्हे हिल्स परिसरातील माऊली नगरात घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील माऊली नगरात दिनकर खेमचंद पाटील (वय ४३) हे वास्तव्यास असून ते खासगी कंपनीत नोकरीला आहे दि. २१ एप्रिल रोजी मध्यरात्री तीन वाजता त्यांच्या मुलाला पुणे येथे जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर सोडले. त्यानंतर सकाळी पाटील दाम्पत्य बऱ्हाणपूर येथे लग्नासाठी गेले होते. लग्नाहून परततांना ते त्यांच्या सासूरवाडी येथे मुक्कामी थांबले होते. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचे सेफ्टी डोअरसह मुख्य दरवाजा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील हॉल, किचनसह बेडरुममधील साहित्य अस्ताव्यस्त फेकून त्यांनी कपाटात ठेवलेले १५ हजार रुपयांचे कानातील झुमके आणि ३३ हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज चोरुन नेला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी तालुका पोलीसांसह श्वान पथक व ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सीकचे पथक दाखल झाले होते. त्यांनी घटनास्थळाहून पुरावे गोळा केले असून त्यावरुन पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.