जळगाव मिरर | ६ सप्टेंबर २०२५
राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या मालिका घडत असतांना आता वाशिम शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरातून सायकलवरून क्लासला जाण्यासाठी निघालेल्या मुलीला रस्ता ओलांडताना भरघाव खासगी बसने उडविले. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी दि. ५ रोजी घडली. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. कु. संध्या उमेश सारसकर (वय १६) असे मृत मुलीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत दहावीच्या वर्गात कु.संध्या शिक्षण घेत होती. दरम्यान ती दुपारच्या सुमारास क्लासला जाण्यासाठी सायकल घेऊन घरातून निघाली होती. रास्ता मोकळा असल्याने सायकलवरून तिने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी पुसदकडे वेगाने जाणाऱ्या बसने जोरदार धडक देऊन सायकलला उडविले. यात मुलगी रस्त्यावर दूरवर फेकली गेली. यानंतर तिच्या अंगावरून बसचे चाक गेले. अंगाचा थरकाप उडविणारी ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. संध्याच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.