जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२५
चाळीसगाव येथे वडिलोपार्जित शेतजमिनीवरील कालबाह्य नोंद कमी करण्याच्या कामासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी मोमीन दिलशाद अब्दुल रहीम (वय २९) यांच्यासह रोजगार सेवक वडिलाल रोहीदास पवार (वय ४०) व दादा बाबू जाधव (वय ४०) या तिघांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराने आपल्या वडिलांच्या नावे असलेल्या मौजे पाथरजे (ता. चाळीसगाव) येथील शेतजमिनीवरील कालबाह्य नोंद कमी करण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. त्यावर प्रक्रिया करून सातबारा उतारा अद्ययावत करण्यासाठी तलाठी दिलशाद मोमीन यांनी रोजगार सेवक वडिलाल पवार यांच्यामार्फत २५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. दरम्यान, दादा जाधव याने तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे समोर आले.
तक्रारदाराने ३ जुलै रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर सखोल पडताळणी केली असता, लाच मागणीची खातरजमा झाली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून वडिलाल पवार यांना तलाठी मोमीन यांच्या वतीने तक्रारदाराकडून २५ हजारांची लाच स्वीकारताना अटक केली. या कारवाईनंतर तिघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडील तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
